तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.
जंगल आणि लाकूडतोड्या
एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्याला नावं ठेवायला जागा नाही.’
तात्पर्य– शत्रूची कीव करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. शत्रूवरही उपकार करण्यात, त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे हे जरी खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्यालाच उपद्रव देऊ शकेल. अशा प्रकारचे साह्य त्याला देणे हा मूर्खपणा होय.
मुंगी व कोशातला किडा
एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.
तात्पर्य– संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.
मित्र
विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,”हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस.” आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.
तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.
बळी तो कान पिळी
एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.’ त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्या गाढवाला ठार मारले.
तात्पर्य– बळी तो कान पिळी.
समाधान
एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.
त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील .
श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही.
साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची !
साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो .
साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .
तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत .
श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे.
हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे.
☆★☆★अर्थात ★☆★☆
या कथेचा आशय हा आहे की, सुख कशात आहे हेच आम्हाला कळत नाही. तर सुख समाधानात आहे. आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही. ते भगवंताच्या भजनानेच मिळते .
भोजनात सुख नसून भजनात सुख आहे. आमच्या जीवनातील भजन नाहीसे झाले आणि आम्ही भोजनाला प्राधान्य दिले म्हणून आम्ही दुःखी आहोत.
अधिक कथा वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
No comments:
Post a Comment